Saturday 5 April, 2008

माननीय, सन्माननीय, आदरणीय...

31 March च्या महाराष्ट्र टाइम्समधील सुरेख लेख - विजयराज बोधनकर

हल्ली या तिन्ही शब्दांची भलतीच चलती आहे. वाढदिवसांच्या निमित्ताने अनेक लोक माननीय होतात. माननीय व्हायला वयाची अट नसते. बड्यांचा मुलगा जसा आपोआपच माननीय म्हणून जन्माला येतो. त्याचे खूप वाढदिवस साजरे होतात आणि आपोआपच तो सन्माननीय होत जातो. नंतर खूप मोठमोठे वाढदिवस साजरे होतात आणि मग ते नकळत आदरणीय होत जातात.

अनेक वर्षांपासून ते कालपरवापर्यंत संकुचित वृत्ती होती ती, नावाच्या बाबतीत. अहो, आपल्या नावापुढे साधा 'श्री' लावायलाही लोक घाबरायचे, बाकीचं तर सोडाच! तेव्हा 'आदरणीय' हा मान कोणा पंडितजी, स्वामीजी किंवा बुद्धिमान उच्चविभूषितांनाच दिला जायचा. कारण स्वत:च्या कर्माने जो आदर निर्माण करायचा आणि मोठ्या विश्वासाने आदरणीय बनायचा, त्याला वास्तवतेचीच जोड असायची. चांगलं काम केल्यानंतर लोकांच्या मनात एक सन्मान निर्माण होतो. शिक्षक, कलाकार किंवा वक्ता यांनाच समाज 'सन्माननीय' संबोधायचा. जे देणग्या देतात, मोठ्या अंत:करणाने चांगल्या कामाला मदत करून आपला मान द्विगुणित करायचे अशांना समाज 'माननीय' म्हणायचा. म्हणजेच आदर, सन्मान आणि मान या तिन्ही शब्दांना योग्य तोच आणि तेवढाच न्याय मिळायचा आणि जे 'सो सो' जगायचे त्यांना 'श्री' किंवा जास्तीतजास्त 'श्रीमान' असे संबोधण्यात यायचं. म्हणजे सोन्याला सोनं, ताब्याला तांबे, पितळाला पितळ आणि लोखंडाला लोखंड म्हणण्याचाच तो काळ होता.

पण आता मात्र काळ बदलला. आता कोणीही केव्हाही कधीही सन्माननीय होऊ शकतो. ज्याला होडिर्ंगचं भाडं परवडतं, फ्लेक्सचा खर्च करणे शक्य आहे तो सन्माननीय होतो. इथे वयाची मर्यादा नसते. कर्तृत्वाची अपेक्षा नसते, अनुभवाचा तगादा नसतो. उत्तम फोटोग्राफर आणि सोबतीला कल्पक डिझाइनर हवा... काव्यात्मक लिहणारा कॉपी रायटर एवढी सामग्री तुमच्या हाताशी असली की तुम्ही ठरवा माननीय, सन्माननीय की आदरणीय बनायचं ते. कारण वाढदिवसावर (स्वत:च्या) प्रत्येकाचा हक्क असतो. वर्षातून एकदा तो साजरा करायचा असतो... मग लाजायचं तरी कशाला?

आपल्या शहरातील होडिर्ंग्ज हल्ली खूप कमवायला लागलेत. चांगला महसूल सरकारी तिजोरीत जातो. त्यातून बरीच विधायक कामं होऊ शकतात. किमान अशा समाज सेवेसाठी तरी आपण आपले वाढदिवस फ्लेक्सवर साजरे करायला हवेत. जेणे करून वाढदिवसाच्या पंधरा दिवस आधी तो फ्लेक्स लागला पाहिजे. यातून चाहता वर्ग तयार होतो आणि लगेचच पुढच्या वाढदिवसाला तुमच्या बॅनरवर (माफ करा, फ्लेक्सवर) तुमचे माननीय शुभेच्छुकसुद्धा येतात. तुमचं माकेर्टिंग फक्त तुम्हाला जमायला हवं.

आताचा काळ बराचसा निर्भय आणि न्यूनगंडमुक्त असा आहे. आपण कोण आहोत, आपलं कर्तृत्व काय, आपली बुद्धिमता किती, आपलं धडाडीचं कार्य, आपले विचार असा तुम्ही नीट विचार करत बसलात, तर आयुष्यात तुम्ही फ्लेक्सवर झळकणार नाही. त्यासाठी कठोर व्हा, निर्भय व्हा आणि स्वत:लाच प्रकाशात आणण्याचा विचार करा. मग, वाढदिवसानंतर सत्यानारायणच्या पूजेचा फ्लेक्स तयार करा. गणपती मंडळात निवड झाली तर त्याची प्रसिद्धी करा... साधं सहभागी प्रमाणपत्र मिळालं तरी संघ समजून त्याचा एक फ्लेक्स लावा.

दिवाळी, होळी, नवरात्र, आषाढी एकादशी, बुवाचं किर्तन, श्रींची पालखी, पास झालेले विद्याथीर् अशा हजारों कारणांसाठी तुम्ही फ्लेक्ससाठी तयार राहिलं पाहिजे. फक्त एकच काळजी घ्या... सारखेसारखे तुमचे फोटो बदलू नका... अहो, लोकं ओळखणार नाहीत. तुम्हाला त्याची सवय लागेल.

स्वत:च्या लग्नाचा फ्लेक्स, नातेवाईकांच्या बारशांचा, मित्राच्या लग्नाचा, ओटी भरण्याचा, जावळ काढण्याच्या कार्यक्रमातही फ्लेक्स करण्यासठी मागे-पुढे पाहू नका. यामुळे शहरातल्या नेहमीच्या चेहऱ्यांपेक्षा थोडे वेगळे चेहरे दिसतील आणि बघाणाऱ्या समाजाला थोडंसं वेगळं बघितल्याचं आत्मिक समाधान मिळेल. बकाल झालेलं शहरही अधिक वेगळं दिसायला लागेल.

पूवीर् बघा, स्वत:च राहतं घर, गाडी किंवा फोन घ्यायला अनेक वर्षं थांबावं लागायचं, पण आता सकाळी नावं नोंदवलं की ते सुख रात्रीपर्यंत दारात हजर. तसंच पूवीर् नावलौकिक मिळवायला प्रचंड मेहनत करावी लागायची. पण आता मात्र तसं नाही. एका रात्रीत किमान आठवड्यासाठी तरी तुम्ही हिरो बनू शकता. क्षुल्लक कारणासाठी भव्यदिव्य फ्लेक्स लावून आपल्याच प्रसिद्धीची तहान भागवू शकता. पण, एका गोष्टीची काळजी घ्या, तुमच्या फ्लेक्सवर आदरणीय भितीयुक्त अशा तीन-चार सन्माननीयांचे फोटो टाकायला विसरू नका. त्यामुळे तुमच्या नावापुढे किामन 'माननीय' हा शब्द तुम्हाला डकवता येईल. मग, तुम्हाला 'माननीय'ची सवय लागेल, ती वाढत जाईल आणि हा हा म्हणता त्या भागात आणि शहराच्या तुरळक भागात तुम्ही फेमस होतच जाणार. लोकांनी इतर मोठ्यांची केली, तशी तुमचीही टिंगल करतील. पण मनावर दगड ठेवा. लोकांच्या मनाचा,

शहराच्या बकालतेचा विचार करू नका. शहराची शोभा वाढवण्यासाठी कायम आपल्या चेहऱ्याची शोभायात्रा भरवत रहा म्हणजे शेवटी तुम्ही सन्माननीय आणि आदरणीय बनतच जाल. तेव्हा लगे रहो मुन्नाभाई... हरि ॐ हरी ॐ

No comments: